ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन
नृत्य, कला, संगीताची पर्वणी असणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात – मंत्री प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन  दिमाखात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त  सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यंदा फेस्टिव्हल हा ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभा यात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठुमाउलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिव्हलमध्ये कलादालनाला त्यांचे नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकली. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगली. ९ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याच बरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाचा मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवडा, अभंग आदींचा सुंदर मिलाफ फेस्टिव्हल मध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *