पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन
त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन
कल्याण: मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या पाटील बालमंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “संस्कृती, परंपरा आणि इतिहास” या विषयावर त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, पारंपरिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यछटा, गीत, वेशभूषा व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
विद्यार्थ्यांनी भारतीय सण-उत्सव, सामाजिक परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून संस्कृती जपण्याचा आणि इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पाटील बालमंदिर शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली.
या कार्यक्रमासाठी केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी थविल, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक गणेश कोट, रोहन कोट, राहुल कोट, नगरसेविका तेजश्री गायकवाड, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, दशरथ तरे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनार, जेसी कटारिया, रामा कांबळे, वैभव पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तर त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी एस जे पाटील, जी एल पाटील, प्राचार्य बी एन पाटील, संध्या पाटील, सुदर्शन पाटील, आशिष पाटील, स्वप्निल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी.पी. निचिते, व्हि.डी. चौथे, रुपाली सावदेकर, लिजी नांबियार, वरिष्ठ शिक्षिका संगिता पाटील, वरिष्ठ शिक्षक विकास पाटील, समस्त शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
