सावरकरांना भारत रत्न दिल्यास
किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत
संदीप चव्हाण
मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारत रत्न किताब दिल्यास या किताबाची प्रतिष्ठा वाढेल अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईतील नेहरू सेंटरच्या सभागृहात झालेल्या संघाच्या शताब्दी महोत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भागवत यांनी ‘ संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितीज ’, या विषयावर शनिवार व रविवारी विस्तृतपणे उहापोह केला.
यावेळी त्यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक ओळख यांवर भर दिला. संघाचे कार्य कोणा धर्माविरुद्ध नसून देश आणि समाजासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहीजे असे ठाम प्रतिपादन केले. त्या पुरस्कार समितीवर मी नाहीय पण समितीशी बोलणे झाले तर मी नक्की तशी सुचना त्यांना करेन असेही भागवत यावेळी म्हणाले.
भागवत म्हणाले की, संघाची स्थापना समाजघडणीसाठी झाली असून गेल्या शतकभरात संघाने सेवा, संस्कार आणि राष्ट्रभावना या त्रिसूत्रीवर काम केले आहे. संघाचा संघर्ष कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा समुदायाशी नसून देशाला एकत्र बांधण्याचा आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारत हा स्वभाव आहे
भारत हा केवल भूगोल नसून तो एक स्वभाव आहे. हा स्वभाव म्हणजेच हिंदूत्व असे ठाम प्रतिपादन करताना
“हिंदू” या संकल्पनेविषयी त्यांनी विस्ताराने सांगितले. की, हिंदू ही केवळ धार्मिक ओळख नसून भारताची सांस्कृतिक ओळख आहे. भारतात राहणारा प्रत्येक नागरिक या व्यापक सांस्कृतिक परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे समाजात भेदभाव न करता समरसतेने पुढे जाण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
संघ समजून कसा घ्यावा, संघाचा विचार, कार्यपद्धती काय, आदी मुद्द्यांवर विवेचन केले आणि भाजप-संघ संबंध यासह राजकारण, समाजकारण, जातीव्यवस्था, अनुसूचित जाती-जमातीची व्यक्ती सरसंघचालक होवू शकते का, यासह अनेक प्रश्नांना परखड उत्तरे दिली.
भाषेच्या मुद्द्यावर बोलताना भागवत म्हणाले की, संघ आपल्या कार्यात भारतीय भाषांना प्राधान्य देतो. इंग्रजी भाषा संवादासाठी उपयोगी ठरू शकते; मात्र भारतीय संस्कृती आणि विचार व्यक्त करण्यासाठी मातृभाषांचे महत्त्व अधिक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
समाजातील मूल्यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, चांगल्या मूल्यांना लोकप्रिय बनवणे ही काळाची गरज आहे. तरुण पिढीने विशेषता झेन झीने केवळ बाह्य आकर्षणांमागे न धावता चारित्र्य, शिस्त आणि सेवाभाव आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संघाच्या नेतृत्वाविषयी बोलताना भागवत यांनी स्पष्ट केले की, संघामध्ये नेतृत्वाची निवड जात किंवा वर्गावर नव्हे, तर क्षमतेवर आधारित असते. संघाची खरी ताकद ही स्वयंसेवकांच्या निस्वार्थ सेवेतील असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दिलेल्या या भाषणातून मोहन भागवत यांनी राष्ट्रसेवा, सामाजिक ऐक्य आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण यांचा स्पष्ट संदेश दिला.
आरएसएसमुळे भाजपला अच्छे दिन
भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगले दिवस (अच्छे दिन) आले नसून संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’ आले असल्याचे परखड प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. भाजपसह संघप्रणित संघटनांनी आपल्या कार्यातून कमावलेले पुण्य त्यांचेच आहे, मात्र या संघटनांमध्ये संघातून गेलेले कार्यकर्ते असल्याने त्यांंच्या पापाचा थोडा वाटा आमच्याकडे येतो व आम्ही तो स्वीकारतो, असे भागवत यांनी स्पष्ट केले
