परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान
अनिल ठाणेकर
ठाणे- मंगळवारपासून राज्यात बारावीच्या तर 20 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, यासाठी रिक्षा चालकांनी कोणतेही भाडे नाकारू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक – मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केले आहे.
ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद् गाठणे परीक्षार्थीना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करणार आहेत. मात्र, आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत, परीक्षार्थीना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावे, असे आवाहन प्रधान यांनी केले आहे. यासंदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंती केली आहे.
चौकट
राष्ट्रवादी (श.प.) चे कार्यकर्ते सज्ज
वाहतूक कोंडी अथवा इतर कोणत्याही अडचणीमुळे विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मदतीला उभे राहणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजीत पवार, कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भोईर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहू पाटील ( +918424004747) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते अनुक्रमे कळवा, ठाणे आणि घोडबंदर पट्ट्यात दुचाकीवरून विद्यार्थ्यांना अडचणीच्यावेळी परीक्षा केंद्रावर पोहोचवतील, असेही मनोज प्रधान यांनी सांगितले.
