२ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेचा लोकशाही दिन
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे मार्च २०२६ चा लोकशाही दिन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.
नमुंमपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या महिन्यांतील लोकशाही दिन आयोजित करण्यात आले नव्हते. आता आचारसंहिता संपल्यानंतर मार्च महिन्याचा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. या लोकशाही दिनासाठी इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतींमध्ये तयार करून १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या नावे सादर करावेत. अर्जाच्या दर्शनी भागावर ‘लोकशाही दिनाकरिता अर्ज’ असा ठळक उल्लेख करणे आवश्यक आहे.
लोकशाही दिनासाठीचा अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nmmc.gov.in या वेबसाइटवरील Quick Links आयकॉनमध्ये उपलब्ध असून नागरिकांना तो सहजपणे डाउनलोड करता येणार आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या नूतन मुख्यालय इमारतीतील जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, सेक्टर १५ ए, किल्ले गांवठाणजवळ, सी.बी.डी. बेलापूर येथेही अर्जाचा नमुना विनामूल्य उपलब्ध आहे.
अर्ज करताना नागरिकांनी अर्जातील तक्रार अथवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित आणि एकाच विषयावरील असावा. तसेच संबंधित विषयाबाबत अर्जदाराने यापूर्वी विभाग कार्यालय किंवा विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असणे आवश्यक आहे. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, महसूल/अपील प्रकरणे तसेच सेवाविषयक व आस्थापना विषयक बाबींवरील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्जही स्वीकारले जाणार नसल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसल्यास तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर देण्यात आलेल्या किंवा देण्यात येणाऱ्या प्रकरणांबाबत पुन्हा त्याच विषयावर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
