स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केल्यास सावरकरांचा नाही तर या पुरस्काराचाच गौरव वाढणार आहे, इतके सावरकरांचे योगदान मोठे आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा प्रवास नवी क्षितिजे या विषयावर विविध शहरांमध्ये व्याख्याने देऊन डॉ. भागवत देशभरात नागरिकांशी संवाद साधत आहेत. मुंबईत त्यांनी काल या विषयावर व्याख्यान दिले तर आज उपस्थित मान्यवरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तेव्हा सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या देशभक्त व्यक्तीचे देशाच्या इतिहासात योगदान हे अगदी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगेच आहे. मात्र काही व्यक्तींच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना या देशात सत्ताधाऱ्यांनी कायम उपेक्षितच ठेवले. आजही त्या वेळेचे सत्ताधारी विरोधी पक्षात आल्यावर देखील सावरकरांवर टीकाच करत आहेत, हे विशेष.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून परदेशात जाऊन तिथल्या स्वातंत्र्यप्रेमी तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना अटक करून जहाजाने भरतात आणले जात असताना त्यांनी जहाजातून उडी मारली आणि पोहत जाऊन फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचले होते. मात्र तिथे देखील त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांच्यावर खटले चालून दोन प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जन्मठेपेची शिक्षा अंदमानच्या तुरुंगात भोगत असताना देखील त्यांनी भिंतीवर करून ठेवत काव्यरचना केल्या होत्या. आपण तुरुंगात राहिलो तर स्वातंत्र्यलढ्यात काहीच करू शकणार नाही. त्यापेक्षा बाहेर येऊन पडद्याआडून तरी काही करता येईल या हिशोबाने ते इंग्रज सरकारच्या काही अटी मान्य करत तुरुंगाबाहेर आले होते. त्यानंतर भारतात येऊन त्यांनी इंग्रजांच्या अटींचे पालन करत इथे जी काही समाज सुधारणा केली की वादातीतच होती.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थिती बदलेल असे सर्वांनाच वाटले होते. मात्र सावरकर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले, तर ते आपल्याला डोईजड होतील अशा भीतीने तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांच्यावर विविध बंधने घातली. महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता असे आरोप करून त्यांना विविध खटल्यांमध्ये अडकवले. नेहरूंनंतर इंदिरा गांधींनी सावरकरांना कायम उपेक्षितच ठेवले. त्यांचे साहित्य देखील फारसे प्रसारित होऊ दिले नाही. एक आठवण अशी सांगितली जाते की पंडित हृदयनाथ मंगेशकर हे मुंबई आकाशवाणीत संगीत नियोजक म्हणून नोकरीला असताना त्यांनी तिथे सावरकरांचे जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला ही दोन गीते ध्वनिमुद्रित करण्याचा निर्णय घेतला. हे कळताच त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना आपली नोकरी गमवावी लागली होती. नंतर त्यांनी खाजगीरित्या ही दोन्ही गीते लता मंगेशकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली आणि ती जागतिक स्तरावर पोहोचली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर सामाजिक अभिसरणात अमूल्य असे योगदान असतानाही तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांच्याबद्दल कायम अपप्रचारस केला. त्यांनी या देशात हिंदूंचे संघटन व्हावे म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी हिंदू महासभा नामक राजकीय पक्षाची स्थापना देखील केली. मात्र तो पक्ष आज काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. भारतात प्रत्येक तरुणाला सैनिकी शिक्षण अनिवार्य करावे अशी त्यांची मागणी होती. भारताचे विभाजन करण्याला त्यांचा विरोध होता. मात्र जेव्हा विभाजन झाले तेव्हा पाकिस्तानातून हिंदू जसे परत आले तसेच इथले सर्व मुसलमान पाकिस्तानात पाठवले जावे असा त्यांचा आग्रह होता. मात्र या विषयावरून सुद्धा त्यांना खूप बदनाम केले.
आजही काँग्रेसचे नेते त्यांच्याबद्दल कायम अपप्रचारच करतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात अनुदान उद्गार काढले होते. त्याबद्दल त्यांच्या विरोधात सावरकरभक्तांनी ठिकठिकाणी न्यायालयात खटले देखील दाखल केले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही जुनीच मागणी आहे. मात्र काँग्रेसने त्याला कायम विरोधच केला. देशात अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना त्यांनी अंदमान मध्ये सावरकरांच्या नावाने एक अखंड ज्योत निर्माण केली होती. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी या ज्योतीसाठी सतत इंधनपुरवठा होईल याची व्यवस्था केली होती. मात्र मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणीशंकर अय्यर यांनी तो इंधनपुरवठा बंद केला आणि ती ज्योत देखील बंद करायला लावली होती. त्यासाठी महाराष्ट्रात अय्यर यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनेही झाली होती.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांना सावरकरांना भारतरत्न द्यावा ही मागणी वारंवार केली जाते आहे. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. मोदी सरकारला कायम अडचणीत आणू बघणारे शिवसेना नेते ही मागणी वारंवार करत असतात. इतरही सावरकरभक्त या मागणीचा आग्रह धरतात. त्यामुळे मोदी सरकारने याबाबत तात्काळ पुढाकार घेऊन सावरकरांना भारतरत्न जाहीर करायलाच हवा. येत्या २६ फेब्रुवारीला त्यांची पुण्यतिथी आहे, तर २७ मे रोजी जयंती आहे. त्यापूर्वी सावरकरांना भारतरत्न जाहीर केल्यास मोहनजी म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच भारतरत्न चा गौरव वाढणार आहे. मात्र जरी भारतरत्न जाहीर झाला नाही तरीही या देशातील स्वातंत्र्य युद्धात आणि सामाजिक अभिसरणाच्या चळवळीत सावरकरांचे अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *