रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी
विशिष्ट ठिकाणी भटक्या श्वानांना मिळणार मेजवानी
मिरा -भाईंदर: नागरिकांकडून अनेकदा मुक्या प्राण्यांना भररस्त्यात अन्न टाकले जाते. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यास सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे करतानाच भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊ नये याकरता महापालिकेने शहरात २० ठिकाणी फिडिंग स्पॉट तयार केले असून या ठिकाणी येऊन श्वानांना यतेच्छ ताव मारावा लागणार आहे.
न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोकळ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी भटक्या कुत्र्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाणपोई व फिडिंग स्पॉट तयार करण्याचे आदेश दिले होते. परिपत्रक राज्य शासनाकडून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनंतर मिरा- भाईंदर महापालिकेकडून भाईंदर पूर्वेत १, पश्चिमेत ७ व मीरा रोडमध्ये १३ फिडिंग स्पॉट तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे.
प्राणीमित्र रस्त्यावर तसेच मोकळ्या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांना खायला टाकतात. एकाच ठिकाणी खाद्यपदार्थ मिळत असल्याने भटके कुत्रे त्या ठिकाणी टोळी बनवतात. परिणामी रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर भुंकणे आणि हल्ला केल्याच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी, नागरिकांची सुरक्षा व प्राणी मित्रांना शिस्त लावल्यासाठी महापालिकेकडून हे फिडिंग स्पॉट तयार करण्यात आले असून त्याबाबत जनजागृती करणे सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली.
फिडिंग स्पॉटसाठी केलेला खर्च वाया जाऊ नये यासाठी भटक्या प्राण्यांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर प्राणीमित्रांनी खाद्यपदार्थ टाकण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या फिडिंग स्पॉटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार ठिकाणे वाढवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.
