“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव
रमेश औताडे
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘घुसखोर पंडित’ या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत महाराष्ट्र करणी सेनेने खांदेश्वर पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे तक्रार दाखल केली आहे. या वेब सिरीजचे शीर्षक व कथानक समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ घुसखोर पंडित ” हे नाव ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे असून हिंदू धर्मासाठी पूज्य मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण समुदायाची अवहेलना करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी ब्राह्मणांद्वारे पार पाडले जातात आणि त्यामुळे ब्राह्मण जातीचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजासह विविध हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वेब सिरीज समाजात द्वेष, असंतोष आणि धार्मिक तेढ वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असल्याचे सेंगर यांनी सांगितले.
या प्रकरणी वेब सिरीजचे दिग्दर्शक मनोज बाजपेयी तसेच संबंधित निर्मात्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५२, ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील तपास सुरू करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
