काळ्या कामगार कायद्यांविरोधात, धर्मराज्य पक्षाची गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने
अनिल ठाणेकर
ठाणे-केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी,’धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरुवार,१२ फेब्रुवारी, लोकशाहीमार्गाने निदर्शने करण्यात येणार आहेत.पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राजन राजे यांनी, आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार आहे आणि म्हणूनच, जास्तीत जास्त कामगारबंधूंनी या आंदोलनाला उपस्थित रहावे असे आवाहन राजन राजे यांनी केले आहे. दरम्यान, डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ही निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याच अनुषंगाने राजन राजे यांची, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांबाबत तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच अहिल्यानगर येथे बोलताना, “उद्योजकांना त्रास देणाऱ्या घटकांना ठोकून काढू” असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे, गल्लीतल्या गुंडाची भाषा असून, त्यांच्या वक्तव्याचा देखील ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे खरपूस समाचार घेणार आहेत.
