महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी
नाशिक : महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरविरुध्द झुंज देत असताना नाशिकच्या संघाने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिला सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात योगेश राऊत ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. दुसऱ्या सामन्यात यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात संदीप चौधरी ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. तिसऱ्या सामन्यात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पुष्कर तऱ्हाळ ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले.
उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत साखळी फेरीतील अजेय घोडदौड नंतर आरोग्य विद्यापीठाचा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द झाला. नाशिकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. कोल्हापूरच्या संघाने हे लक्ष्य १९.५ षटकांत ८ बाद १५८ धावा करत गाठले. केवळ २ गडयांनी विजय मिळवत कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यापीठाच्या संघातील पुष्कर तऱ्हाळ यांना मालिकेतील ’सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील येशात गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे. पुष्कर तऱ्हाळ यांनी आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील ’बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट’ (सर्वोत्तम गोलंदाज) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या क्रिकेट संघात संघव्यवस्थापक राजेश पाटील व कर्णधार योगेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर तऱ्हाळ, संदीप चौधरी, पवन गोलवाल, राजेंद्र दिवे, प्रविण जगताप, महेंद्रनाथ चौधरी, नंदकिशोर ठाकरे, नंदकिशोर वाघ, विजय कुरकुरे, संतोष जढाळ, बबन कांगणे, सचिन शिराळ, मुकुंद मुळे आदी खेळाडू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.
