महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी देऊ नका – उपनेते विजय साळवी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी न देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण शहरातील काही भूखंड खेळाच्या मैदानासाठी व उद्यानासाठी आरक्षीत करुन ठेवते. त्या आरक्षीत भुखंडावर लाखो रुपये खर्च करुन क्रिडाविषयक सर्व प्रकारच्या सुविधा असलेली क्रिडांगणे व करमणुकीसाठी बगीचे विकसीत करत असते. या क्रिडांगणांचा वापर फक्त क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी होणे आवश्यक आहे. हि क्रिडांगणे महापालिकेने व्यवसायीक उपक्रमासाठी देणे म्हणजे खेळाडू व क्रिडाप्रमींवर अन्यायकारक आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या संघटने तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त हिंदुहृदयसम्राट श्री २०२६ ही जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा महापालिकेच्या यशवंतराव क्रिडांगणावर (मॅक्सी ग्राऊंड) येथे शुक्रवारी आयोजित केली होती. यासाठी महापालिकेचे या क्रिडांगणाचे रितसर भाडे व डिपोझीट भरण्यात आले होते व महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती. परंतु त्या स्पर्धेच्या वेळी या मैदानात भाजी विक्रीचा आठवड्याचा बाजार मांडण्यासाठी अनेक भाजी विक्रेते सर्वप्रकारचे स्टॉल, भाजी व इतर वस्तू घेऊन मैदानात आले आणि त्यांनी स्पर्धेच्या आयोजकांबरोबर वाद गळात मैदानात भाजी विक्रीचा बाजार मांडण्याचा आग्रह धरला.
मैदानाचे रीतसर भाडे भरलेले असताना मैदानात भाजी विक्री करुन व्यवसाय करण्यात येत असेल तर ते निषेध करण्यासारखे आहे. त्यामुळे या विषयात लक्ष घालावे, मैदाने व उद्याने फक्त क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमासाठीच वापरण्यात येणे बाबत योग्य ते निर्देश प्रशासकीय आधिकाऱ्यांना द्यावेत. महापालिकेच्या मैदानात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय होऊ नये, क्रिडांगणे व्यवसाय करण्यासाठी वापरात येऊ नयेत अशी मागणी शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. याबाबत प्रशासना तर्फे योग्य ती कडक कारवाई न झाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटने तर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा साळवी यांनी दिला आहे.
