‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी डिवचलं
हरिभाऊ लाखे
नाशिक : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. भगतसिंह कोश्यारी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील व्याख्यानावर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत असताना कोश्यारी यांनी राज ठाकरेंना डिवचत त्यांच्यावर टीका केली.
मुंबईतील नेहरू सेंटर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष करून अभिनेते सलमान खान यांच्या हजेरीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे सर्व लोक संघाच्या प्रेमाखातर आले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता.
राज ठाकरेंच्या या पोस्टबाबत भगतसिंह कोश्यारी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “व्याख्यानाला आलेले कुणीही पंतप्रधान मोदींना घाबरलेले नसावेत. मी राज ठाकरेंचा सन्मान करतो. मला वाटते, राज ठाकरे पंतप्रधान मोदींना खूपच घाबरलेले दिसतात. त्यांनी मोदींना घाबरू नये. त्यांनी मोदींच्या जवळ जायला हवे. जसे प्रभू रामजीसाठी सर्व प्रजा सारखीच होती, तसे पंतप्रधान मोदींसाठीही सर्व समान आहेत.”
राज ठाकरे माझे लहान भाऊ
भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, “राज ठाकरे माझे लहान भाऊ आहेत. ते कणखर नेते आहेत. मी त्यांना सांगेन की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी घाबरू नये. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र या कर्मभूमीत राहता, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामाला घाबरा.”
भाषेच्या अस्मितेवर देशभरात जे तंटे सुरू आहेत, तो एकप्रकारचा आजार आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता कोश्यारी म्हणाले, मी आजघडीला भाजपाचा सदस्य नाही. मी राजकारणात सक्रिय नाही. तसेच मी संघाचा प्रवक्ताही नाही. त्यामुळे या बाबीवर मी उत्तर देऊ शकत नाही.
मी अजित पवारांचा आदर करतो…
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरही कोश्यारी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी अजित पवारांचा खूप आदर करतो. अजित पवारांनी त्यांच्या टिकाकारांना कधीही वाईट म्हटलेले नव्हते. ते नेहमी प्रेमाने वागत. रोहित पवारांनी त्यांचे मुद्दे सरकारकडे मांडावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *