विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी तुला’ कार्यक्रम संपन्न
कल्याण : विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत त्रिवेणी तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या मांगल्यपूर्ण मातृस्तुती ग्रंथाची तुला करण्यात आली. द्वितीय पूजाऱ्यांना दान देण्यासाठी पितांबर पंचा वस्त्रांची तुला करण्यात आली, तर तिसऱ्या टप्प्यात अन्नधान्याची तुला करण्यात आली. या सर्व तुला केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे विजयकुमार यांचे पुत्र नारायण पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन विजयकुमार यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख, कल्याण पूर्वचे नारायण पाटील यांनी केले होते. शतकपूर्ती सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, जिल्हा प्रमुख तात्या माने, उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे, हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नितीन निकम, विशाल पावशे, युवासेनेचे निरज कुमार, महिला शहर संघटक मीना माळवे, सुनीता ढोले, राधीका गुप्ते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारायण पाटील यांनी आपल्या पित्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सांगितले की, “आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. वडील विजयकुमार पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, सेवाभाव, संस्कार आणि समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आम्हाला दिली. त्यांनी कधीही केवळ स्वतःपुरते जगणे स्वीकारले नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा ध्यास घेतला. आज त्यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त त्रिवेणी तुला करून त्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, हेच त्यांच्या शिकवणीचे खरे फलित आहे.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे, आप्तस्वकीयांचे, गुरुबांधवांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानतो. वडिलांचे जीवन हेच आमच्यासाठी आदर्श असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही संकल्प करतो असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *