पालघर पूर्व विभागात रेल्वे तिकीट काउंटर सुरू करा
खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मागणी
सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल
योगेश चांदेकर
पालघरः पालघर शहराचे पश्चिम रेल्वेने दोन विभाग केले असून, पालघर पश्चिम आणि पालघर पूर्व असे ते दोन विभाग आहेत. पालघर पश्चिममध्ये रेल्वेचे तिकीट घर आहे; परंतु पालघर पूर्वेला तिकीट काउंटर नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन डॉ. हेमंत सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांना पत्र लिहिले असून पालघर पूर्व भागात रेल्वेचे तिकीट काउंटर सुरू करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते शाम बनपट्टे यांनी डॉ. सवरा यांना पत्र देऊन पालघर पूर्व विभागात तिकीट काउंटर नसल्याचे निदर्शनास आणले होते. डॉ. सवरा यांनी लोकसभेत रेल्वेचे विविध प्रश्न मांडून त्याचे निराकरण केले तसेच प्रवाशांच्या गैरसोयी दूर केल्या. याबद्दल बनपट्टे यांनी सवरा यांचे कौतुक करून पूर्व विभागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन तेथे रेल्वे काउंटर सुरू करण्याची मागणी केली होती.
पूर्व भागातील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
सध्या पूर्व विभागात रेल्वेचे तिकीट काउंटर नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच दिव्यांग प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून पश्चिम विभागात जावे लागते. ही बाब गैरसोयीची आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. पालघर शहराचा पूर्व भाग वेगाने विकसित होत असून या भागातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्व विभागात स्वतंत्र तिकीट काउंटर असणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी सवरा यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते.
सवरा यांनी महाव्यवस्थापकांचे वेधले लक्ष
शाम बनपट्टे यांच्या पत्रानुसार डॉ. सवरा यांनी तातडीने या प्रश्नाकडे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांचे लक्ष वेधले. पालघर पूर्व विभागात रेल्वेचे तिकीट काउंटर नसल्यामुळे प्रवाशांची किती गैरसोय होते, हे त्यांनी निदर्शनास आणले. पालघर हे वेगाने विकसित होणारे शहर असून पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण होत आहेत. या लोकांना रेल्वे शिवाय अन्य चांगला पर्याय नाही. दररोज रेल्वेने येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूर्व विभागातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन तेथे रेल्वे तिकीट काउंटर तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार सवरा यांनी केली आहे. आता याबाबत रेल्वेचे महाव्यवस्थापक काय निर्णय घेतात, याकडे पालघर पूर्व विभागातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *