श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणेचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न
ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे ७ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील मान्यताप्राप्त कथ्थक नृत्य संस्था श्री गणराज नृत्य कला निकेतन यांच्या २५ वर्षपूर्तीचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या संस्थापिका नृत्यालंकार  मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, पं. नंदकिशोर कपोते, पं. बाळासाहेब सूर्यवंशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, सुयोग पत्की, संजीव ब्रह्मे, अ‍ॅड. माधवी नाईक, गुरु डॉ. मंजिरी देव, तालमणी पं. मुकुंदराज देव आणि श्री श्रीराम देव यांसह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली व त्यांनी संस्थेला आशीर्वाद दिले.
कार्यक्रमात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध कथक नृत्यप्रस्तुती आणि थीमॅटिक सादरीकरणे केली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापिका मनाली देव, त्यांच्या वरिष्ठ शिष्य आणि साथीदार कलाकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमादरम्यान श्री गणराज नृत्य कला निकेतनचा प्रवास आणि संस्थापिका मनाली देव यांच्या कलासाधनेचा आढावा घेणारी सुमारे १५ मिनिटांची लघुचित्रफीत सादर करण्यात आली, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे महिला सक्षमीकरणावर आधारित “शक्तिरूपेण संस्थिता” हा अनोखा संगीत-नृत्य बॅले. तसेच प्रसिद्ध तबलावादक रोहित देव यांनी सादर केलेली विशेष थीमॅटिक फ्युजन संगीतरचना रसिकांना विशेष भावली.
मनाली देव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “आग्र्याहून सुटका” हा प्रभावी गतभाव सादर केला, तसेच बिंदादिन महाराजांची ठुमरी सादर केली ज्याला गायनाची साथ गुरू तालमणी पं मुकुंदराज देव यांनी केली, ज्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कथक रचना आणि मराठी गीतांवरील नृत्यप्रस्तुतींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे सुंदर निवेदन वृंदा दाभोळकर यांनी केले. साथसंगत कलाकार म्हणून अवधूत घेवडेकर (तबला), ओमस्वरूप कोटकर (तबला), मंदार दीक्षित (हार्मोनियम), प्राजक्ता जोशी (गायन), आकाश कुलकर्णी (कीबोर्ड) आणि सिद्धेश मडकईकर (क्लॅप बॉक्स) यांनी कार्यक्रमाला सुरेल साथ दिली.
गडकरी रंगायतन उत्साही प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. संस्थेच्या काशिनाथ घाणेकर शाखेतील पालकांनी मनाली देव यांच्या छायाचित्रांनी सजवलेला सुंदर केक भेट देऊन गुरुंच्या हस्ते केक-कटिंग केले.
कार्यक्रमाची सांगता लेझीम आणि कथ्थक तत्कार यांच्या अनोख्या संगमाने झाली.
एकंदरीत, २५ वर्षांच्या कलासाधनेचा हा सोहळा ठाणेकर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला आणि श्री गणराज नृत्य कला निकेतनच्या समृद्ध परंपरेची साक्ष देऊन गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *