मुंबई, ठाण्यात महिला राज

स्लग- मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे भाजपाच्या पहिल्या महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर

० ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या  शर्मिला पिंपळोलकर महापौर तर भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर

० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापौर-उपमहापौरांना दिल्या शुभेच्छा

० ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्याच दिवशी वॉकआऊट

स्वाती घोसाळकर

मुंबई : मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत आजपासून महिला राज सुरू झाले. मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे तर ठाणे महापालिकेत शर्मिला पिंपळोकर यांनी महापौरपदाची सुत्रे हाती घेतली. मुंबईतील महापौरपद हे भाजपासाठी विशेष होते. पहिल्यांदा मुंबई भाजपाचा महापौर झाला असून तो मान रितू तावडे यांना मिळाला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शंकर घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली.

मुंबईत २२७ सदस्यीय सभागृहात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने ठाकरे गटाने महापौरपदासाठी उमेदवारच दिला नाही. विरोधी पक्षांनी उमेदवार न दिल्याने विशेष सभेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रितू तावडे यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला.

 ५३ वर्षीय रितू तावडे या घाटकोपर पूर्व मतदारसंघातून तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून त्यांनी २०१२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शिक्षण समिती अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले असून पाणीटंचाई, करवाढ, फेरीवाले, स्वच्छता या मुद्द्यांवर त्या आक्रमक राहिल्या आहेत. भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांनी नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे. उपमहापौर संजय घाडी हे दहिसर–मागाठाणे वॉर्ड क्रमांक ५ येथून निवडूण आले आहे. २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले. महायुती करारानुसार उपमहापौरपदसव्वा वर्षासाठी त्यांच्या ताब्यात राहणार आहे.

मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी ठाकरेंच्या सेनेचा राडा

मुंबई:  मुंबई महापालिकेत भाजपच्या रितू तावडेंनी महापौरपदाची शपथ घेत पदभार स्वीकारला तर दुसरीकडे काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. तर, ठाकरेंच्या नगरसेवकांनीही कागदे भिरकावत वॉकआऊट केला.

महापौर आणि उपमहापौर यांनी सभागृहात भाषण केले, यावेळी शिवसेना नेते उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहातून वॉकआऊट केला. किशोरी पेडणेकर यांनी शिंदेच्या नगरसेवकांची देहबोली विक्षिप्त होती, असा आरोप केला आहे.

कॉग्रेसच्या महिला नगरसेवकांना आज जमिनीवर बसावे लागले, आज आम्ही प्रदुषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलो होतो. मात्र आम्हाला बसायलाही जागा दिली नाही. भाजपच्या पहिल्या महापौर बसल्यानंतर आम्ही मात्र जमिनीवर होतो. देवाभाऊंची बहिण महापौराच्या खुर्चीवर आणि आमच्या बहिणी जमिनीवर होत्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नगरसेवक अश्रफ आजमी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *