नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन
हरिभाऊ लाखे
नाशिक : शहरात प्रथमच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन १४ फेब्रुवारी रोजी पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे. संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना आणि जिव्हाळा यांच्या पुढाकारातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिवस भरगच्च असणार आहे.
सकाळी ‘संस्कृती दर्शन’ फेरीने संमेलनाची सुरुवात होणार असून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विविध सत्रे पार पडतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिका कुसुम आलाम असतील. उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा. भास्कर,भगरे तसेच नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर या आमदारांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, माजी महापौर रंजना भानसे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, उपायुक्त दिनकर पावरा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, आदिवासी प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात आदिवासींचे वास्तव जीवन साहित्यात आहे का ?, या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय लोहकरे असतील. डॉ. पद्माकर सहारे, डॉ. सुलतान पवार, डॉ. मधुचंद्र भुसारे, साहित्यिक रवी बुधर आणि लेखक राजू ठोकळ हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मुलाखत सत्रात साहित्यिक देवचंद महाले विविध आदिवासी साहित्यिक, राजकारणी व कलाकारांच्या मुलाखती घेणार आहेत. महिला सत्राच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा चौरे असून या सत्रात आदिवासी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. यानंतर युवा कवी संतोष पावरा यांच्या सहभागातून नवोदित कवी संमेलन होईल.
निमंत्रित कविसंमेलन ज्येष्ठ कवी तुकाराम धांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. याशिवाय सांस्कृतिक फेरी, लघुनाट्य, आदिवासी पारंपरिक नृत्य, चित्रप्रदर्शन आदी कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. काही लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यातील आदिवासी साहित्य, संस्कृती आणि विचारप्रवाह यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *