ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर!
जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे भव्य ‘शिवजयंती उत्सव २०२६’ चे आयोजन
ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातील ‘जनस्वराज्य प्रतिष्ठान’ च्या वतीने गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती सोहळ्याचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून ऐतिहासिक संस्कृती, समाजप्रबोधन आणि जनसेवा यांचा त्रिवेणी संगम ९० फिट रोड, पारसिक नगर, खारीगांव, कळवा येथे ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.
या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर कृष्णा दादु पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. मुख्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  संजय केळकर उपस्थित राहणार असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
संदिप लेले (जिल्हाध्यक्ष, भाजपा), राजाराम साळवी (अध्यक्ष, आगरी सेना), दशरथ पाटील (उपनेते, शिवसेना) ,संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे (ज्येष्ठ नगरसेवक), विकास पाटील (नगरसेवक), अशोक भोईर (माजी उपमहापौर), सचिन मोरे (अध्यक्ष, के.बी.पी. कॉलेज) आणि विक्रम भोईर (सरचिटणीस, भाजपा) मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे. तसेच परिसरातील सर्व स्थानिक नगरसेवकांची देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे.
शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात गायक नंदेश उमप यांचा ‘शिवगिते व पोवाड्यांचा नजराणा’. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून जिवंत केला जाईल. तसेच, प्रा. विशाल गरुड यांचे ओघवते व्याख्यान तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. शिवताल ढोल ताशा पथक (नाशिक) यांच्या कडकडाटात निघणारी मिरवणूक आणि वाद्यवादन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे..
केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत जनस्वराज्य ही संस्था विविध उपक्रम राबवते आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “हा उत्सव केवळ एक सोहळा नसून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ठाणेकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील व त्यांचे विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *