३० वे समर्थ खो-खो शिबीर
दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष!
मुंबई: दादरच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा जोश, जिद्द आणि जाज्वल्य परंपरेचा संगम रंगणार आहे! भारतातील अग्रगण्य क्रीडा संस्था असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरने शतकोत्तर वर्षात पदार्पण करताना क्रीडाप्रेमींसाठी आणली आहे खास मेजवानी, ३० वे समर्थ खो-खो शिबीर! खो-खोच्या मैदानावर शिस्त, चपळता आणि संघभावनेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी यंदाही खेळाडूंना मिळणार आहे.
परंपरेचा वारसा आणि गौरवशाली कामगिरी
श्री समर्थ व्यायाम मंदिर ही केवळ संस्था नसून भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व आहे. खो-खो क्षेत्रातील नामांकित संघ म्हणून समर्थची देशभरात ओळख आहे.  संस्थेतील खेळाडू व प्रशिक्षकांनी पद्मश्री पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा संघटक शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार अशा मानाच्या सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
खो-खो शिबिराचे आयोजन व वेळापत्रक
३० वे समर्थ खो-खो शिबीर हे मंगळवार १७ ते गुरुवार २६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. समर्थ क्रीडा भवन पटांगण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (पश्चिम), मुंबई येथे हे शिबीर सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत शिबिरार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरार्थींना प्रामुख्याने खो खो, लंगडी, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसन इत्यादी शिकवले जाणार आहे.
या कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समर्थचे अनुभवी खेळाडू शिबिरार्थींना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खो खो सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *