चायनिज वर पिझ्झा भारी
स्वाती घोसाळकर
मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला. इटलीने टी२० वर्ल्डकप क्रिकेटमध्ये नेपाळचा पराभव करीत आपला पहिला एतिहासिक विजय मिळविला. पिझ्झा, फुटबॉलनंतर आता क्रिकेटमध्येही आपली मोहर उमठवण्यासाठी इटालीयन क्रिकेटर सज्ज आहेत असा इशाराच जणू त्यांनी आपल्या खेळाने दिला.
पिझ्झामध्ये जसे विविध चटकदार पदार्थ असतात तसे चटकेदार फटकेबाजी आज इटलीच्या फलंदाजांनी केली. नेपाळी बॉलर्सला आज सिक्सरचा वर्षाव करीत वानखेडेची हवाई सफर घडवून आणली.
इटलीसारख्या उदयोन्मुख संघाचा हा विजय केवळ आकडेवारीतला यश नाही; तो जागतिक क्रिकेटच्या विस्ताराचा पुरावा आहे. क्रिकेट नव्या भौगोलिक सीमांमध्ये पाय रोवत आहे. सहयोगी देशांमधील पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे.
अँथनी आणि जस्टिन मोस्को या बंधूंच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर इटलीने नेपाळवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
कर्णधार हॅरी मॅनेंटी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इटलीच्या गोलंदाजांनी नेपाळच्या फलंदाजांना कोंडीत पकडले. बेन मॅनेंटी याने भेदक मारा करत चार षटकांत २ बाद ९ धावा अशी प्रभावी कामगिरी केली, तर क्रिशन कलुगामागेने १८ धावांत ३ बळी घेत नेपाळचा डाव १२३ धावांत आटोपला.
१२४ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इटलीला मॉस्का बंधूंनी झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनीही नाबाद १२४ धावांची सलामी भागीदारी रचत नेपाळला पूर्णपणे नामोहरम केले. अँथनी मॉस्काने ३२ चेंडूत ६२ धावांची आक्रमक खेळी साकारली, तर जस्टिन मॉस्काने ४४ चेंडूत ६० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
