व्हॅलेन्टाइन दिवस हा भारतीय नसला तरी प्रेम हा विषय मात्र जागतिकच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सोनेरी-चंदेरी क्षणांचा सोबती असतो आणि त्यामुळेच कदाचित नव्या पिढीने प्रेमासाठी या दिवसाचा पाठपुरावा केला असावा असे मानायला जागा आहे. या दिवशी प्रियकर आणि प्रेयसी यांनी आपल्या प्रेमाची जणू ‘वार्षिक’ साक्षच देणे गरजेचे असते असे मानले गेले. त्याला कुणी प्रेमाचा वाढदिवस म्हटले तर कुणी आणखी काही पण अक्ख्या जगात या दिवशी फुलांची उलाढाल प्रचंड होत असते. केवळ फुले देऊन समाधान होत नसेल म्हणूनही कदाचित पण या दिवशी एकेमेकांना वस्तूंच्या भेटीदेखील दिल्या जातात.
देशादेशात यासाठी काही प्रचलित रीती आहेत. त्यापैकीच एकामध्ये व्यक्तीची स्वत:ची आणि तिच्या जीवनाशी संबंधित अशी एखादी तरी वस्तू पुरुष अथवा महिला व्हॅलेन्टाइनला देण्याची प्रथा आहे. आयर्लंड या देशात  १८व्या आणि १९व्या शतकात पती-पत्नी एकमेकांना अशा व्हॅलेन्टाइन भेटी देत असत. यामुळे नाती कायम राहतात आणि आपले अलिखित प्रेम व्यक्त केले जाते असे मानले जायचे. भेट दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये शुभेच्च्छा पत्रे, कपडे, गोड पदार्थ अथवा महाग अशा दाग-दागिन्यांचाही समावेश असे. पण खरे तर आजच्या काळात अशा काही वस्तूंना चक्क ‘छी, हे काय’ अशी संभावना होण्याचीही शक्यता भरपूर आहे. कारण या वस्तू चक्क ‘केसाळ’ असायच्या.
केसांची एखादी बट किंवा त्यांचा सुंदर आवरणात पण दिसेल अशी भेट वस्तू त्या काळात अनमोल मानली जायची. त्यासोबतच अशी भेट म्हणजे नितांत सुंदर आणि प्रगतीशील सोबतीच्या कायम राहण्यासंबंधी ग्वाही असायची असेही म्हणता येईल. अशी भेट देणारी मंडळी आपला संदेश व्यवस्थित पोचवू शकेल अशा विचारपूर्वक निर्णयातून वस्तू ठरवीत असत सर्वसाधारणपणे महिलांसाठी मनगट अथवा बोटे यांच्यासाठीची आभूषणे आशयाची हे ओघाने आलेच.अमुक एका पुरुष अथवा महिला व्यक्तीने दिलेली अशी व्हॅलेन्टाइन भेट स्वीकारायची किंवा कसे हे समोरच्या व्यक्तीने ठरवायचे असे. इतकेच नव्हे तर वर्षभर ही प्रेमसंबंध टिकले नाहीत तर मिलालीली अशी भेट वस्तू परत करण्याचीही व्यवस्था असायची असे मानले जाते.
आताच उल्लेख केलेल्या ‘केसाळ’ या काहीशा विचित्र वाटणाऱ्या भेटीचा त्या काळातील मागोवा घेताना असे दिसते की ही भेट अजरामर अशा प्रेमाची निशाणी समजली जायची, इतकेच नव्हे तर अशा शोभिवंत आभूषणांचा पुरुष आणि महिला आपल्या पेहरावात कुठेतरी उपयोग करीत असत. साडीवरील ‘ब्रूच’ नावाचे किंवा गळ्यातील चेनमध्ये गुंफलेले लॉकेट अशी आभूषणे असायची. अशा व्हॅलेन्टाइन भेटवस्तू जपुउन ठेवण्याची हमखास जागा असायची ती म्हणजे ‘उशीखाली’. काही वेळा तर अशा भेटवस्तू आपल्या पेहरावात लपवूनही ठेवाव्या लागायच्या….इथे गोष्ट छुप्या प्रेमाची असायची कदाचित… आयर्लंड मधी एका गृहस्थांनी अशा भेटवस्तूंची नोंदही ठेवली होती अशी माहिती मिळते. तर मंडळी, अशी ही जुन्या व्हॅलेन्टाइनची साठा उत्तरांची कहाणी नव्या महिला आणि पुरुष व्हॅलेन्टाइन जनतेला सुफळ होवो ही सदिच्छा…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *