चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला

लोकमान्यचा रजाक खान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला

मुंबई: चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने सचिन्द्र आयरे फाऊंडेशनच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. लोकमान्य शिक्षण संस्थेचा रजाक खान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला मेडल देऊन गौरविण्यात आले.लालबाग, गॅस कंपनी लेन येथील बिंदूमाधव ठाकरे मनोरंजन मैदान येथे झालेल्या अंतिम सामन्यात लोकमान्य शिक्षण संस्थेने गिरगांवच्या मारवाडी हायस्कूलचा ५८-३५ असा पाडाव करीत “विद्यार्थी चषक” व रोख रु. दोन हजार(₹ २०००/-) आपल्या नावे केले. उपविजेत्या मारवाडी हायस्कूल संघाला चषक व रोख रु. एक हजार पाचशे(₹ १५००/-) वर समाधान मानावे लागले.

लोकमान्यने आक्रमक सुरुवात करीत ५व्या मिनिटाला लोण देत १२-०६ अशी आघाडी घेतली. पुन्हा अकराव्या मिनिटाला दुसरा लोण देत आपली आघाडी २७-१५ अशी वाढविली. पण विश्रांती पूर्वी मारवाडी हायस्कूलने लोणची परतफेड करीत ही आघाडी २५-३० अशी आघाडी कमी केली. मध्यंतराला ३१-२५ अशी लोकमान्य संघाकडे आघाडी होती. विश्रांती नंतर पुन्हा आक्रमकते वर भर देत आणखी २लोण देत सामना सहज आपल्या बाजूने झुकविला. रजाक खान याचा अष्टपैलू खेळ त्याला यश भगत व अरुण जावळे यांची मिळालेली चढाई व पकडीची साथ यामुळे लोकमान्यने हा विजय मिळवला. मारवाडी हायस्कूलच्या सचिन तिवारी यांने एकाकी लढत दिली. या अगोदर झालेल्या उपांत्या सामन्यात लोकमान्यने कुर्ल्याच्या विनोबा भावेचा ६२-६० असा पराभव केला. तर मारवाडी हायस्कूल विरुद्ध संघ अनुपस्थित राहिला. लोकमान्यच्या अरुण जावळे व मारवाडीच्या सचिन तिवारी यांची स्पर्धेतील उत्कृष्ट पकड व चढाईचे खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्यांना देखील मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तारक राऊळ(शिवछत्रपती पुरस्कार ), योगेश पवार (शिवछत्रपती पुरस्कार ), संध्या काळे, रविंद्र करमरकर (शिवछत्रपती पुरस्कार ), जीवन पैलकर, प्रकाश साळुंखे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सचिन्द्र आयरे फाऊंडेशनच्या सचिन्द्र आयरे, सुरेश गोरिवले, सुरेश मोरे, अशोक लोटलीकर, हरिश्चंद्र साळुंखे, संतोष गावडे व इतर सदस्यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *