ठाण्यात डिजिटल क्रांतीची सुरुवात..शिक्षण व प्रशासनाला मिळणार नवे बळ
(सिद्धेश शिगवण)
ठाणे : वर्तकनगर, ठाणे येथील भाजप कार्यालयात आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, वाचनालये व शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमांतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना देणे, अध्यापन अधिक परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होतील आणि वेळेची बचत होईल, असे त्यांनी नमूद केले. शासनाचे ‘पारदर्शक आणि गतिमान प्रशासन’ हे धोरण राबविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *