महाशिवरात्री निमित्त १००० हून अधिक भक्तांचा ठाणे व मुंबईत भव्य सहभाग
अंतर योग फाउंडेशनचे स्वामी उपेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली विशेष साधना संपन्न
ठाणे- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंतर योग फाउंडेशनतर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली सर्वांसाठी खुली आणि मोफत जीवन-परिवर्तनकारी विशेष साधना मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली. फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या भव्य आध्यात्मिक सोहळ्यास ठाणे व मुंबई परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ७ वाजता प्रारंभ झालेल्या या साधना शिबिरात आरोग्य, समृद्धी, सुदृढ नातेसंबंध, शैक्षणिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती यांसाठी विविध प्रभावी उपक्रम आयोजित करण्यात आले. सहभागी साधकांनी ध्यान, जप, प्रार्थना आणि उर्जाधारित साधना यांचा अनुभव घेत आत्मिक समाधान लाभल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान महामृत्युंजय यज्ञ आणि शिवलिंगावर अभिषेक यांसारखे पारंपरिक व प्रभावी विधी संपन्न झाले. इच्छापूर्तीसाठी तपस्वी ब्राह्मणांद्वारे संकल्प करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला देण्यात आला. विशेष म्हणजे, हीलिंग साधनेचे परिणाम जाणून घेण्यासाठी पूर्व व पश्चात वैद्यकीय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रावीण्य मिळविण्यासाठी विशेष साधना सत्र आयोजित करण्यात आले होते. अनेक पालकांनी आपल्या मुलांसह सहभाग नोंदवून सकारात्मक ऊर्जा, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सहभागींनी तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन, झोपेची गुणवत्ता आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवल्याचे सांगितले. अनेकांनी “अशी दिव्य साधना आयुष्यात प्रथमच अनुभवायला मिळाली,” असे म्हणत आयोजकांचे आभार मानले. यावेळी ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्र जी म्हणाले, “योग्य साधना केल्यास आत्ता आणि इथे त्वरित फलश्रुती प्राप्त होते, यालाच खरे अध्यात्म म्हणतात.” सामाजिक स्वास्थ्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने अंतर योग फाउंडेशन देशभरात अशा कार्यशाळांचे आयोजन करत असून, तीन कोटी लोकांपर्यंत ही अद्वितीय साधना पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, फाउंडेशनची ‘सायन्स ऑफ हीलिंग’ ही संकल्पना विविध राष्ट्रीय संस्थांकडे सादर करण्यात आली असून, पारंपरिक ज्ञानपद्धती आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधण्याच्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. ठाण्यात सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर मुंबईत संध्याकाळी आयोजित सत्रालाही मोठ्या संख्येने साधक उपस्थित राहिले. भविष्यातही अशा मोफत आणि सर्वसमावेशक साधना शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
