‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मनीषा शर्मा यांनी स्वीकारला पुरस्कार
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक, नवनीत भवन या सातमजली गुजरात भवनचे निर्माते डॉ हेमराजभाई शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमराज शाह : एक समर्पित जीवन ‘ या डॉक्युमेंटरीला नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित न्यू दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आले असून या डॉक्युमेंटरी च्या यशस्वी दिग्दर्शिका मनीषा शर्मा यांना बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुमारे साठहून अधिक देशांच्या चित्रपट निर्मात्यांनी भाग घेतला होता. कच्छ या वळवंटातून लहानपणी मुंबईत येऊन संघर्षमय जीवन जगणाऱ्या आणि सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या तसेच विविध पुरस्कारांनी तसेच डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आलेल्या डॉ हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ ही डॉक्युमेंटरी मनीषा शर्मा आणि सरस्वतीचंद्र आचार्य यांनी दिग्दर्शित केली असून या डॉक्युमेंटरी चे नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण करण्यात आले. या डॉक्युमेंटरी ला ‘बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. डॉ हेमराजभाई शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा हे नाटक रंगभूमीवर येत आहे तसेच ‘कलष छलके’ ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे. वसंत मारु आणि कवन सावला लिखित हेमूदादा नाटकाचे या दोन महिन्यात पाच प्रयोग होणार आहेत तर ज्येष्ठ पत्रकार किशोर व्यास यांनी ‘कलष छलके’ ही कादंबरी लिहिली आहे.
