को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धा
अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत
मुंबई: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अपना सहकारी बँक, रत्नागिरी जिल्हा को-ऑप. बँक, महानगर को-ऑप. बँक आदी संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अपना सहकारी बँकेने बलाढ्य सांगली जिल्हा बँकेचा ९ धावांनी पराभव करतांना अष्टपैलू आदित्य धवल (१४ धावा व ३ बळी) व पंकज पडवळ (१३ धावा) यांनी दमदार खेळ केला. प्रकाश उत्तेकरने नाबाद १३ धावा काढूनही सांगली जिल्हा बँकेला मर्यादित ५ षटकात ६ बाद २८ धावांपर्यत मजल मारता आली.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या म्युनिसिपल को-ऑप. बँकेला रत्नागिरी जिल्हा बँकेच्या गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी करून मर्यादित ५ षटकात ४ बाद ३३ धावसंख्येवर रोखले. सलामीवीर योगेश सावंत (नाबाद १४ धावा) व समीर गराटे (११ धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी २७ धावांच्या भागीदारीमुळे रत्नागिरी जिल्हा बँकेने चौथ्या षटकाला २ बाद ३६ धावा फटकावून विजय संपादन केला. एमएससी बँकेविरुध्द प्रथम फलंदाजी करतांना महानगर को-ऑप. बँकेने सलामीवीर आदित्य सावंत (नाबाद २४ धावा) व विलास घेमुड (नाबाद २५ धावा) यांच्या टोलेबाज फलंदाजीमुळे ५ षटकात १ बाद ७६ धावा फटकाविल्या. विजयी लक्ष्याच्या ओझ्याखाली सार्थक दाफाळचा (१६ धावा) अपवाद वगळता एमएससी बँकेची फलंदाजी ३६ धावसंख्येवर कोसळली आणि महानगर बँकेने ४० धावांनी शानदार विजय मिळविला. विलास शेळकेने १४ धावांत ४ बळी घेतले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, नितीन गवादे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.
