राज्यशास्त्राच्या जेन झी विद्यार्थ्यांनी केलं “पॉलिटिका २०२६” या उपक्रमाचे आयोजन

मिरा -भाईंदर : अभिनव महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पॉलिटिका २०२६” हा उपक्रम विद्यार्थी शिक्षकांनी उत्साहात साजरा केला. विभागाने “आम्ही राज्यशास्त्राचे जेन झी विद्यार्थी, स्वतःला आवड निर्माण करणारे, मनोरंजक, आणि सर्वांसाठी सक्षम राजकारण बनवण्याचा अधिकार देतो” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून विविध स्पर्धा आयोजित केल्याची माहिती राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नितीन सोनावणे यांनी दिली.

जेन झी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राजकारणाच्या विविध पैलूबाबत जागरूक होऊन प्रत्यक्ष सहभाग घेण्यासाठी उत्तेजन मिळावे या उद्देशाने विविध स्पर्धा आयोजित केल्या. या उपक्रमात उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सीडीसी चेअरमन किरण पाटील व प्राचार्य डॉ. अल्विन मेनेझेस यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

“युवा संसद” हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते. यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. अर्चना केळकर यांनी स्पर्धकांना पूर्वतयारी करताना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. भारतीय संसदीय कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रश्न उत्तराचा तास, झीरो अवर तसेच विधेयक पारित करणे इ . कार्यप्रणालीचा यात समावेश होता. “पॉलिटीका २०२६” केंद्रित निबंध लेखन, पोस्टर आणि संसदेचे प्रतिरूप बनविणे, व्हॉट ईफ…, जेन झी लिंगो वर्ड, ओपन माइक आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रमाची सुरुवात युवा संसदने झाली. तसेच यावेळी भारत, जपान, चीन व रशिया या चार देशांच्या संसद इमारतींची प्रतिरूपे बनविण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *