नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी

स्थायी समितीत मिळाले स्थान!

हरिभाऊ लाखे

नाशिक: महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सोमवारी राजकीय पक्ष व आघाडीच्या तौलानिक बळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपने महापौर व उपमहापौरपदाच्या स्पर्धेतील काहींना स्थायीवर संधी दिली. अपक्ष विजयी झालेल्या मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आघाडी करीत तर, मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना शिंदे गटाशी आघाडी करीत स्थायीत प्रवेश मिळवला. महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्याबरोबर होता. निकालानंतर मनसे शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी करीत एकप्रकारे सत्तेत सहभागी झाली. तर भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे हे अजित पवार गटाने आधीच दिलेल्या पाठिंब्यामुळे अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी झाले. या समीकरणांनी बहुमतात असणाऱ्या भाजपला स्थायीत अधिक बळ मिळणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महापौर, उपमहापौरांबरोबर स्थायी समिती व सभापतीला विशेष महत्व आले आहे. सदस्य पदांसाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी स्पर्धा होती. महापौर व उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष स्थायी सभापतीपदाकडे आहे. २२ सदस्यांच्या पालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. अखेरच्या क्षणी राज्यातील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला भाजपने उपमहापौरपद देत बरोबर घेतले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. पालिकेत शिवसेना शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विविध समित्यामध्ये अधिकतम प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी समीकरणे जुळवली. महापालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गट मनसेच्या गटाला चार, शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस आघाडीला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि् अपक्ष आघाडीच्या एका सदस्याला संधी मिळाली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडून पक्षनिहाय सदस्यांची नावे जाहीर झाली.

भाजपने महापौर पदाच्या स्पर्धेतील माधुरी बोलकर आणि दीपाली कुलकर्णी तसेच उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावे लागलेले मच्छिंद्र सानप यांच्यासह नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड यांची स्थायीवर नियुक्ती केली. शिवसेना शिंदे गट-मनसे आघाडीकडून मनसेच्या मयुरी पवार, शिंदे गटाच्या किरणताई गामणे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष आघाडीचे मुकेश शहाणे यांची अशा एकूण १६ जणांची स्थायी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आघाडी केल्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या मुकेश शहाणे यांची लॉटरी लागली. अजित पवार गटाने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

मनसेही सत्तेत सहभागी

महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने एकत्रित लढली होती. ठाकरे गटाला १५ तर मनसेला एक जागा मिळाली. निकालानंतर समीकरणे बदलली. शिवसेना शिंदे गटाने मनसेला सोबत घेऊन पालिकेत गट स्थापन केला. भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाला सत्तेत बरोबर घेतले. विलास शिंदे उपमहापौर होऊन शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे शिंदे गट आणि मनसेची आघाडी आहे. शिंदे गटाने या पक्षाच्या नगरसेविका मयुरी पवार यांना स्थायीत संधी दिली. या राजकीय समीकरणांनी नाशिक पालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाबरोबर एकप्रकारे मनसेचाही समावेश झाला आहे. एकत्रित निवडणूक लढणाऱ्या ठाकरे गटाने मनसे व काँग्रेसला सोबत घेऊन एकत्रित आघाडी स्थापन करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, मनसेने शिंदे गटासोबत आघाडी केली. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना आधीच माहिती दिल्याचे ठाकरे गटातील पदाधिकारी सांगतात. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *