खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल
मुंबई : मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत फक्त उपकंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु या मेट्रो प्रकल्पाचा मुख्य कंत्राटदार अनिल अंबानींची रिलायन्स इन्फ्रा कंपनी असून या कंपनीवर मात्र अद्याप कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिलायन्स इन्फ्रा कंपनीवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.
मेट्रो स्लॅबप्रश्नी भाजपा महायुती सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्रा ही मुख्य कंत्राटदार आहे. २०१८ मध्ये अस्टाल्डीसोबतच्या संयुक्त उपक्रमात असलेल्या रिलायन्स इन्फ्राला हे कंत्राट देण्यात आले होते आणि त्यानंतर विविध विलंब आणि साइटवरील समस्यांमुळे हे काम मिलान बिल्ड टेकला देण्यात आले होते, असे असले तरी २०२६ मध्येही रिलायन्स इन्फ्रा कंपनी या कामाची मुख्य कंत्राटदार आहे. मेट्रो घटनेप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही असा दावा सरकारने केला होता ? मग रिलायन्स इन्फ्रा कंपनी आतापर्यंत चौकशीतून सुटली आहे का? एपस्टाईन फाइल्स, उद्योगपती अनिल अंबानी व केंद्रातील भाजपा सरकार यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे दिसते, म्हणून भाजपा सरकार त्यांच्यावर विशेष मेहरबानी दाखवत आहे काय, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
००००००००
