स्वीकृत नगरसेवक पदासाठी न्याय मिळेल या प्रतीक्षेत प्रामाणिक कार्यकर्ता
भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांचे पक्ष श्रेष्ठींना साकडे
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत 122 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समिती सदस्य निवड आणि स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लागले आहे. केडीएमसीमध्ये 10 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार असून यामध्ये 5 शिवसेना शिंदे गट, 4 भाजपा आणि एक शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपली ताकद पणाला लावत आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीतील जुने कल्याण शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांनी देखील पक्षाकडे स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जुने कल्याण शहर अध्यक्ष अमित धाक्रस यांना पत्र दिले आहे.
प्रशांत माळी हे जोशीबाग सारख्या विभागातून जनसंघाचे नेते मुरलीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली १९९६ शालेय जीवनापासून विद्यार्थी आघाडी, युवा मोर्चा शहर जिल्हा, सचिव, वॉर्ड अध्यक्ष तसेच सध्या भाजपा सरचिटणीस जुने कल्याण शहर या पदावर कार्यरत आहेत. लहानपणापासून भाजीपाला व्यवसाय करीत शालेय जीवन व त्यानंतर पूर्ण वेळ भाजपचे प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. मधल्या काळात कल्याण (प.) मधील मोठ्या गटबाजीमुळे १ वर्ष पक्षाच्या बाहेर होते. एकदा महापालिकेची उमदेवारी हक्क असतांना ऐनवेळी पक्षात आलेल्या सदस्याला देण्यात आली. मागील वेळेस परिवहन सदस्यच्या वेळी जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या मुलासाठी माघार घ्यावी लागली. या वेळीस ही ओबीसीसाठी प्रभाग क्र. ८ मध्ये उमेदवारी मागितली होती पण बजरंग दलाचे जुने कार्यकर्ता या विभागात इच्छूक असल्यामुळे पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य करून त्या प्रभागात प्रामाणिकपणे कार्य केले.
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूकीच्या माध्यमातून केलेले प्रामाणिक कार्य व पक्षवाढीसाठी असलेली ओढ व पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा मानस या सर्व बाबीकडे विचार करून तसेच सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून केलेले महापालिका क्षेत्रातील लोकहिताच्या कार्याचा सन्मान करून स्वीकृत सदस्यासाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी प्रशांत माळी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीलं पक्ष किती दाद देतो हे पहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *