महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त
वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाण्यातील शेठ एनकेटी हॉल, खारकर आळी या ठिकाणी करण्यात आले.

गेल्या २४ वर्षापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इ. जिल्ह्यातील व तालुक्यातील आदिवासी, मागासवर्गीय, भटके-विमुक्त जाती जमाती, बालमजूर, निराधार, अनाथ, आणि बालसुधारगृहातील गरीब व गरजू मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संस्था राबवीत आहे.

यावर्षी देखील ३००० मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम (गणवेश, नोटबुक, चप्पल-बूट, बॅग, पाटी-पेन्सील, कंपास पेटी, पेन, व इत्यादी शैक्षणिक साहित्य) आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे हे उपस्थित होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन डावखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या प्रसंगी महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरचे चेअरपर्सन बुधाजी पाटोळे, सुरेखा राऊत, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा झेंडे, चाईल्ड लाईन हेल्पच्या सोनाली पुफळा, प्रियेश साबळे पाटील, बालाजी इंजिनियरिंगचे सर्वेसर्वा प्रीतम रॉय आणि ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा,पालघर जिल्हा, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बालशिक्षण सुधार केंद्रातील व शाळांतील शिक्षक कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विधवा व निराधार श्रमिक महिला संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आदिवासी, मागासवर्गीय, गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कामामध्ये प्रकल्पाचे सर्वेसर्वा प्रियेश साबळे पाटील यांचा मोठा वाटा असून अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अनुषंगाने आणि अथक प्रयत्नाने २०२१ पासुन या प्रकल्पाने आतापर्यंत १ करोड ८२ लाख मुला मुलींची शिक्षणाची विनामूल्य सेवा केली असून या सर्वे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *