मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी
मुंबई जिल्हा कॅरम संघटना आयोजित भारतीय आयुर्वीमा महामंडळ, ओ एन जी सी व हिंदुस्थान पेट्रोलियम पुरस्कृत ३३ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने डी के सी सी च्या सिद्धांत वाडवलकरचा २०-१३, २५-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत डी के सी सी च्या निरज कांबळेने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियावर १९-८, १९-११ असा विजय मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. महिला एकेरीच्या अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. यात रिझर्व्ह बँकेच्या अंबिका हरिथने जैन इरिगेशनच्या मिताली पाठकवर २५-१२, १२-२५ व २५-१५ असा विजय मिळवला. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ए के फाऊंडेशनच्या सोनाली कुमारीने जैन इरिगेशनच्या ऐशा साजिद खानवर २५-२१, १०-२४ व २५-४ असा विजय मिळवला. पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम फेरीत विजय कॅरम क्लबच्या हेमंत पांचाळने मुंबई महानगरपालिकेच्या शांतीलाल जितियावर तीन सेटनंतर २५-१६, १३-२२ व १७-१२ अशी मात केली. तर या गटाच्या तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या ए के फाऊंडेशनच्या बाबुलाल श्रीमलने हाफकिन इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स क्लबच्या पवन मेस्त्रीला २२-१२, १५-१८ व २५-१० असे नमवले.
आंतर कचेरी सांघिक गटात मुंबई महानगरपालिकेच्या “ अ संघाने त्यांच्याच “ ब “ संघावर ३-० असा विजय मिळवला. या विजयात विकास धारियाने भरत कळीवर २०-११, २१-१३ असा तर गिरीश तांबेने सुपेश कामतेकरवर २५-५, २५-९ असा विजय मिळवला. दुहेरीच्या सामन्यात संतोष जाधव आणि दिनेश केदार जोडीने विनोद बारिया व जितेंद्र राठोड यांना १९-१८, १६-१५ असे हरवले. तर आंतर क्लब सांघिक गटात अंतिम लढतीत डी के सी सी ने ए के फॉउंडेशनवर २-१ असा निसटता विजय मिळवला. यात ए के फाऊंडेशनच्या हरेश्वर बेतवंशीने एक मात्र विजय नोंदवताना डी के सी सी च्या सौरभ मतेवर २५-५, १९-१८ अशी मात केली होती. परंतु डी के सी सी च्या सिद्धांत वाडवलकरने ए के फाऊंडेशनच्या नीलांश चिपळूणकरला २५-१२, १९-१४ असे सहज हरवले. तर दुहेरीच्या लढतीत मिहीर शेख व निरज कांबळे जोडीने ओंकार टिळक व महम्मद रझा जोडीवर ५-२५, २५-१० व २५-५ असा विजय मिळवत आपल्या संघाला विजयी केले.
मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मयेकर यांच्या शुभहस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.
