मुंबई महापालिकेत ५७ हजार पदे रिक्त
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील तब्बल ५७ हजार पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कामगार संघटनांव्दारे केली जात आहे. राज्यात लवकरच ७० हजार सरकारी पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या भरतीसहीत महापालिकेतीलही हा अनुषेश भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे महापालिकेतही नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या पत्रात कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे – बापेरकर यांनी म्हटले आहे की, मुंबई व मुंबई उपनगरातील जनतेला उत्तम नागरी सेवा पुरविता याव्यात यासाठी पालिकेचे १२९ विभाग व खाती कार्यरत आहेत. ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये व ५ संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठीची रुग्णालये, प्रसुतिगृहे यामधून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. हे सर्व विभाग आणि रुग्णालये योग्य प्रकारे चालविली जावीत यासाठी पालिकेच्या रचना व कार्यपध्दती विभागाने सखोल अभ्यास करून, कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या १ लाख ४५ हजार १११ अशी निश्चित केली आहे. तथापि, सध्या ही कर्मचारी संख्या सेवानिवृत्ती, मृत व इतर कारणांमुळे कमी झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेत जेमतेम ९० हजाराच्या आसपास कामगार – कर्मचारी आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येत आहे. रिक्त पदांमुळे अत्यावश्यक सेवेतील काम ठप्प होऊ नये म्हणून कंत्राटी कर्मचारी भरती केली जात आहे. कोणेतही कायमस्वरुपी व सततचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेणे उचित नसताना पालिका मागील अनेक वर्षांपासून रिक्त शेडयुल्ड पदे न भरता कंत्राटी भरती करत आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कामगार भरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, मुंंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात येतील. असे आश्वासन पालिका प्रशासनाच्यावतीने वारंवार दिले जाते. मात्र रुग्णालयातील अत्यावश्यक रिक्त पदे पुन्हा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याकरीता नुकतीच जाहिरातही देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी भरती बंद करावी आणि पदभरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून तुटपुंजा पगारामध्ये कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, शासनाच्या भरती धोरणाच्या अधीन राहून कायम करावे व उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.
