अंत भला तो सब भला…

शेवट्च्या मॅचमध्ये नेपाळचा पहिला विजय वर्ल्डकप विजय

स्कॉटलंडचा केला पराभव

वाढदिवशी गुलशन झाने ठोकला विजयी चौकार

मुंबईत :  टी२० क्रिकेट वर्ल्डकपच्या आपल्या शेवटच्या मॅचमधये मुंबईत रंगलेल्या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडवरील थरारक विजयासह स्पर्धेचा संस्मरणीय शेवट केला. वर्ल्डकपमधिल नेपाळचा हा पहिलाच विजय ठरला. नेपाळचे फॅन्स खूप दिवसापासून ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण अखेर काल वानखेडे स्टेडियमवर त्यांना मिळाला आणि वानखेडे स्टेडियमवर अखेर नेपाळचा जल्लोष घुमला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात नेपाळने ७ गडी राखत विजय मिळवत या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला वहिला विजय मिळवला. नेपाळला या वर्ल्डकप स्पर्धेत वेस्टइंडिज, इंग्लंड आणि इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता.

आजच्या मॅचमध्ये नेपाळला शेवटच्या षटकात ६ चेंडूंमध्ये ५ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर एक धाव काढली गेली आणि सर्वांच्या नजरा वाढदिवस साजरा करणाऱ्या २० वर्षीय गुलशन झाकडे वळल्या. झाने वाइड लॉन्ग-ऑन च्या दिशेने दमदार फटका मारत चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. सीमारेषेजवळ जॉर्ज मुशेने झेल वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे पाय दोरीला लागल्याचे स्पष्ट होताच चौकार घोषित झाला आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जल्लोष उसळला. हा सामना औपचारिक असला तरी खेळातील थरार आणि स्कॉटलंड संघांची झुंजार कामगिरी यामुळे संस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धचा सामना नेपाळने जिंकला असता तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा चाहत्यांत रंगली होती. मात्र या विजयासह नेपाळने मान उंचावून मायदेशी परतण्याचा आनंद मिळवला.

या विजयात दिपेंद्र सिंग ऐरी आणि गुलशन झा हे दोघे नायक ठरले. दोघांनीही अभिमानाने मैदान सोडताना एकमेकांचे अभिनंदन स्वीकारले. संपूर्ण नेपाळ संघाने मैदानावर ‘लॅप ऑफ ऑनर’ घेत चाहत्यांचे आभार मानले. सामनावीर पुरस्कार ऐरीला देण्यात आला. मायक्रोफोन हातात घेताच प्रेक्षकांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. मुंबईत चारही सामने खेळताना साथ दिलेल्या सर्व चाहत्यांचे ऐरीने मनापासून आभार मानले.

अन्ततः जित्यौं…

अन्ततः जित्यौं… म्हणजे अखेर जिंकलोच्या मेघ गर्जनेने विजयाचा अवघा आसमंत आज दुमदुमून गेला… नेपाळच्या पाठीराख्यांनी वानखेडे हाऊसफुल होते. स्कॉटलंडवरील विजयानंतर नेपाळच्या संघाने स्टेडियमला विजयी परेड केली आणि त्यांच्या चाहत्यांनीही अन्ततः जित्यौँ असे खास नेपाळी भाषेत अखेर जिंकलोच म्हणत त्यांचे कौतुक केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *