कल्याण  आगीत १२ वाहने खाक

कल्याणकल्याण पश्चिमेतील लालचौकी भागातील एका उच्चभ्रू इमारतीच्या तळमजल्याला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत १२ वाहने जळून खाक झाली. यामध्ये मोटार, दुचाकी आणि सायकलींचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

आग नक्की कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. आगीत तीन मोटारी, सहा दुचाकी, तीन सायकली जळून खाक झाल्या. पहाटेच्या सुमारास इमारतीच्या परिसरात धूर आणि टायर जळल्याचा वास सर्वदूर पसरला.

दोन दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेत मानपाडा रस्त्यावरील सागाव भागात चेरानगरमध्ये रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंटच्या तळमजल्याला पहाटे चारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत रहिवाशांच्या तळमजल्याला उभ्या केलेल्या एकूण २९ दुचाकी, मोटारी जळून खाक झाल्या. यावेळी घरातून बाहेर पडताना आगीची झळ लागून पाच रहिवासी जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *