डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ
मानपाडा पोलिसांकडून दोन वितरक गजाआड
बनावट टेल्मा एएमबीपीच्या टॅबलेट विक्री करणारी टोळी गजाआड
कल्याण: उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मा एएम या नामांकित औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत डोंबिवली आणि मुंबईतील दोन बड्या औषध वितरकांना अटक केली आहे. डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’चा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना मनपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबल्ससह बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका असल्याचा धक्कादायक खुलासा एफडीएने केला असून या तपासात बिहार कनेक्शन समोर आले आहे.
औषध विक्रेता नामे पंकज उपाध्याय हा टेल्मा एएम हे ब्लड प्रेसर चे बनावट औषध असल्याचे व ते मानवी शरीरास अपायकारक असल्याचे, तसेच या बनावट औषधाच्या वापरामुळे मानवी आरोग्यास धोका पोहचू शकतो हे माहित असताना सुध्दा हे औषध मुळ उत्पादकाचे असल्यासारखे दर्शवून त्याचे “श्रीराम फार्मा” या औषध विक्री परवान्यामार्फत विकी करत होता. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी २० जानेवारी रोजी छापा टाकून त्याच्याकडून ८ लाख ९४ हजार ४०० रूपये किंमतीच्या टेल्मा एएम या गोळ्यांच्या एकूण २७९५ स्ट्रीप जप्त करून मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करत दावडी येथे राहणाऱ्या पंकज उपाध्याय याला अटक केली.
तपासात हे बनावट औषध त्यास आरोपी विवेक अजयकुमार राय, वय. ३५ वर्ष, रा. कांदीवली हा पुरवीत असल्याने व त्यांनी संगनमताने हा गुन्हा केला असल्याने आरोपी विवेक राय याला १६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वपोनिरी संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश राळेभात व गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *