स्वाती घोसाळकर
मुंबई: जोवर संपुर्ण तपास पुर्ण होत नाही तोवर अजित दादांच्या विमान अपघाताला घात झाल्याचा संशय कायम राहणार आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती इतकी चक्रावणारी आहे की त्यामुळे विमानाच्या पायलटवरच हा अपघात घडवून आणण्यासाठी दबाव होता का असा संशय घ्यायला पुरेशी जागा असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी केला.
रोहित पवार यांनी आज आपल्या दुशऱ्या प्रेझेंटेशनमध्ये अनेक गंभीर चुका उघडकीस आणल्या. मुख्य पायलट सुमित कपूर यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. जेटमध्ये १०-१२ लाख पगार असताना नंतर कमी वेतनावर काम करावे लागले. ते डिप्रेशनमध्ये होते का? त्यांचा गैरफायदा घेण्यात आला का? याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, २७ जानेवारीला अपघाताच्या आदल्या रात्रीला काही व्यक्ती दादांना भेटायला आल्या होत्या तसेच संध्याकाळी ६.५० ते ७.०५ या वेळेत फोनवर संभाषण झाले होते. या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे रोहीत पवारांनी नमूद केले.
रोहित पवार म्हणाले की, विमान मुंबईहून बारामतीला जात असताना त्याचे फ्यूल टँक पूर्ण भरले होते. “बारामतीला दादांना सोडल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर पुढील प्रवासात इंधन भरता आले असते. मग सुरुवातीलाच टँक पूर्ण भरण्याची गरज काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकारच्या एजन्सीकडून तो जळाल्याचे सांगण्यात आले असले तरी तज्ज्ञांच्या मते ११०० अंश सेल्सिअस तापमानातही तासभर राहिल्यासच ब्लॅक बॉक्स डॅमेज होतो, तसेच ६ हजार मीटर पाण्याच्या दाबातही तो टिकतो. मग येथे तो पूर्णपणे जळाला कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घटनास्थळी कागद कमी जळालेले दिसत असताना ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
या दुर्घटनेमागे विम्याचा मुद्दा असू शकतो, असा गंभीर आरोप करत पवार म्हणाले की संबंधित VSR कंपनीच्या विमानाची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये असली तरी प्रत्यक्ष बाजारमूल्य १० ते १५ कोटींपर्यंतच असू शकते. मात्र विमानावर ५५ कोटींचा विमा आणि २१० कोटींची लायबिलिटी असल्याचे त्यांनी सांगितले.
“१००-२०० कोटींसाठी कंपनीला वाचवू नका. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी गुंतवणूकदारांना दिला.अपघात की घातपात याचे सत्य समोर येण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
