डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन
शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
कल्याण : हिंदू धर्मसंस्कृतीत पादुका पूजन व दर्शनाची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. गुरु-शिष्य परंपरेतून आलेल्या या परंपरेला सगुण स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. याच भक्तीभावातून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य सिद्ध पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, २२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता डोंबिवली पूर्व येथील चंद्रेश नीलकंठ बिल्डिंग मागील मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोढा हेवन, निळजे, कल्याण-शिळ रोड येथे करण्यात आले आहे.
रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत ३० गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी दूरवर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांनी दिलेल्या ‘ तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ या संदेशातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ज.न.म. संस्थानाद्वारे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल वितरण होणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भक्त, साधक, शिष्य मोठ्या भक्तिभावाने सहभागी होणार असून सिद्ध पादुका रथात विराजमान करून डोंबिवली परिसरातून कार्यक्रमस्थळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. भजन, नामगजर, टाळ-मृदुंगांचा नाद, भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा, कलशधारी महिला, लेझीम, फुगड्या आणि आकर्षक देखावे यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. वेदोक्त मंत्रोच्चारात पूजन, शेकडो अनुयायांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे.
संस्थानाच्या पुरोहितांकडून वेदोक्त मंत्रोच्चारात सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात येईल.  त्यानंतर प्रवचन सेवा, भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह उपस्थित राहून सिद्ध पादुका दर्शनाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *