जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद
नगरसेविका नम्रता कोळी यांचे आयोजन
ठाणे : टेंभीनाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या पारशी बांधवांच्या अगियारी कंपाऊंडमध्ये आयोजित केलेल्या जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले होते.
पारशी समुदाय वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहत आहे. या समाजातील नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष जन आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड व ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. त्यात ७० वर्षांवरील ९० स्त्री-पुरुष नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून देण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी १०८ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या नागरिकांना लवकरच कार्डचे वाटप केले जाईल, असे नम्रता कोळी यांनी सांगितले. या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नगरसेविका नम्रता कोळी व जयेंद्र कोळी यांनी आभार मानले आहेत.
