‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू
६ विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्हाने गौरवणार; ४ एप्रिल रोजी पुण्यात वितरण
पुणे : उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. देआसरा फाउंडेशनतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यंदा एकूण ६ उद्योजकांना १ लाख व ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या सीईओ प्रज्ञा गोडबोले यांनी दिली.
पुरस्कार तीन प्रमुख गटांमध्ये विभागण्यात आले आहेत:
ड्रीम-५० – वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपर्यंत असलेल्या उद्योजकांसाठी.
ड्रीम-१०० – वार्षिक उलाढाल १.५ कोटी रुपयांपर्यंत असलेल्या उद्योजकांसाठी.
युवा उद्योजक – २५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील उदयोन्मुख उद्योजकांसाठी.
पारितोषिकाचा तपशील
ड्रीम-५० आणि ड्रीम-१०० या गटातून एकूण ४ विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक विजेत्याला १ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येईल.
युवा उद्योजक गटातून २ विजेत्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल.
पुरस्कारासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी आहे. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून तज्ज्ञांच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाणार आहे. अर्जाचे निकष, अटी व सविस्तर माहिती www.deasra.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुक उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या पुरस्कारांचे वितरण ४ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात विशेष समारंभात होणार आहे.
