मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न
दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर हा विशेष करून बंगल्यांचा परिसर असून कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील, शासकीय, खाजगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी इत्यादी उच्चभ्रू लोकांची वस्ती येथे आहे. याठिकाणी एका बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला असून हे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
महाशिवरात्री दिवशी रात्री अडीच वाजता दरम्यान मिलापनगर, एमआयडीसी मधील अभिनव सहकारी बँकेच्या समोरील एका बंगल्यात एक वृद्ध स्त्री घरात एकटीच असताना बंगल्याचे खिडकीचे ग्रील तोडून तीन दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी एका दरोडेखोराने त्याच रात्री १.२५ वाजता या बंगल्यात रेकी करून गेल्याचे सीसी कॅमेरात दिसत आहे. दरोडेखोरांचा हातात कोयते व इतर हत्यारे होती. बंगल्यात कोणीतरी असल्याचे व सदर वृद्ध स्त्री जागी झाल्याचे समजताच त्या तीन दरोडेखोरांनी भागो बोलत पलायन केले.
यानंतर त्या वृद्ध स्त्रीने शेजारी राहणाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता त्यानी मदतीसाठी प्रत्यक्ष येऊन पोलिसांना कळविले. काहीवेळातच मानपाडा पोलीस घटनास्थळी येऊन त्यानी चौकशी करून दरोडेखोरांना पकडण्यासाठी एक पथक रवाना केले. परंतु दरोडेखोर तोपर्यंत पसार झाल्याने मानपाडा पोलीस या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सीसी कॅमेराद्वारे त्यांचा तपास करीत आहेत. यापूर्वीही मिलापनगर परिसरात अशा घरफोड्या झाल्या असल्याने येथील रहिवाशांत घबराट पसरली असून रात्री/पहाटे पोलीस गस्ती वाढवावी आणि या दरोडेखोरांना जेरबंद करावे अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेलफेअर असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे.
