छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण
अशोक गायकवाड
नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: सकाळी ९ वा. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते, उपमहापौर दशरथ भगत व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्यानंतर नेरूळ सेक्टर १ येथील राजीव गांधी उड्डाणपूलाजवळील चौकात स्थापित शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौर महोदयांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेवक रविंद्र इथापे, सुरेश शेट्टी, अंजली वाळुंज, भाऊ भापकर, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे, नेरूळ विभागाच्या सहा.आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, उमेश पाटील, प्रवीण गाडे,पंढरीनाथ चौडे आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवताली आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलेली होती. तसेच जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच चौकांच्या चारही बाजूंना विद्युत दीपमाळांची रोषणाई करण्यात आलेली आहे. पुतळ्यांच्या सभोवताली लक्षवेधी रोषणाई करण्यात आलेली आहे. वाशी येथे पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत प्रसारित करून मानवंदना देण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांची तसेच युवक – युवतींची लक्षणीय उपस्थिती होती. विविध शाळांनी तसेच शिवप्रेमी संघटनांनी आपल्या परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवज्योतीसह पदयात्रा काढून, शिवरायांचा जयजयकार करीत अनोखी मानवंदना अर्पण केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या नामघोषात सारा परिसर निनादला होता. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी चौकात काढलेली छत्रपती शिवरायांची रांगोळी लक्षवेधी होती. अनेकांनी रांगोळी समवेत सेल्फी छायाचित्रे काढली. विशेषत्वाने तरूणाईने चौकातील शिवचरित्रशिल्पकृतींना भेट देऊन शिवरायांचा चरित्रपट जयंतीनिमित्त अनुभवला. शिल्पाकृती वास्तूच्या वरील बाजूस असलेल्या घुमटांवर लावलेल्या शिवरायांच्या विविध भावमुद्रा असणा-या छायाचित्रांमुळे चौकातील वातावरण भारलेले होते. नेरूळ येथील चौकात नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवप्रभूंचा सिंहासनारूढ पुतळा स्थापित करण्यात आलेला असून त्याठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. शिवरायांच्या पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीला केलेली आकर्षक पुष्पसजावट लक्षवेधी होती. दोन्ही ठिकाणी दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, पोवाडे यांचे ध्वनीक्षेपकाव्दारे सादरीकरण होत असल्याने शिवरायांच्या नावाचा गजर नवचैतन्य निर्माण करणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *