दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘वन मरीना’ ची घोषणा
रमेश औताडे
मुंबई : वाय एम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन लाइन्स, दक्षिण मुंबई येथे ७४ मजली ‘ वन मरीना ’ या आलिशान निवासी टॉवरची घोषणा करण्यात आली. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या या प्रकल्पाची अंदाजित किंमत २८०० कोटी रुपये आहे.
या प्रकल्पात २, ३, ४ खोल्यांची घरे तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस घरे ७ कोटी ते ४५ कोटी रुपयांदरम्यान असतील. बहुतांश घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असून ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा आहेत. वाहनतळासाठी ७२२ गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वाय एम इन्फ्रा समूहाचे अध्यक्ष सुहैल याकुब म्हणाले की, हा प्रकल्प दक्षिण मुंबईच्या विकासाला नवे रूप देईल. व्यवस्थापकीय संचालक अतिफ याकुब यांनी हा प्रकल्प दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारा ठरेल, असे सांगितले. अश्विन शेठ समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन एन. शेठ यांनी दर्जेदार आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले.
प्रकल्पाची वास्तुरचना ‘आर्क बाय रेजा काबुल आर्किटेक्ट्स’ यांनी केली असून महिमतुरा कन्सल्टंट्स (रचनात्मक सल्लागार), पीडीए असोसिएट्स (यांत्रिक व विद्युत सल्लागार), क्वांट लेझर्स (प्रकाशयोजना) आणि साइट कॉन्सेप्ट्स इंटरनॅशनल, फिलिपाईन्स (परिसर रचना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
