स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत
हरिभाऊ लाखे
नाशिक: शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व भुयारी गटारांच्या कामांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सध्या विविध भागांत रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच भुयारी मार्ग आणि गटारांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. द्वारका, त्र्यंबक रोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड आदी प्रमुख भागांमध्ये एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे.
विशेषतः द्वारका सर्कल येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. सारडा सर्कल ते काठे गल्ली दरम्यान भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले असले, तरी सध्या दोन ते तीन ठिकाणी एकाच वेळी काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी काठे गल्लीमार्गे मुंबई नाक्याकडे वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले आहे. या मार्गावर विशेषतः मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. ठिकठिकाणी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) देण्यात आले असले, तरी वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे कोंडी टळत नाही.
वाहतूक शाखेतर्फे अतिरिक्त कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून, तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *