दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू
अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
दिवा –दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय ३७) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपअभियंता दीपक पांडे (३०) आणि ठेकेदार राहुल पांचाळ (३३) या दोघांविरोधात मृताचे बंधू भंवरलाल रावल याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
दिवा रेल्वे स्थानकाच्या होम फलाट वरील तिकीट काऊंटर बाहेरील भागात २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.१० च्या सुमारास अर्थिंगसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना खंगाराम रावल यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे राहणारे खंगाराम हे खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. खंगाराम यांच्या मृत्यूप्रकरणी दीपक पांडे आणि राहुल पांचाळ या दोघांनी खंगाराम यांना कोणतेही सेप्टि उपकरण न पुरविल्यामुळे हयगय व निष्काळजीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.
