सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पळस फुलांचे अनोखे सौंदर्य

 शहापूरच्या वनराईत निसर्गाची लालसर उधळण

– अविनाश उबाळेठाणे

फेब्रुवारीच्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच सह्याद्री पर्वतरांग मध्ये पळस फुलांच्या गडद लाल रंगांनी निसर्ग अक्षरशः बहरून गेला आहे. डोंगरमाथे, दाट जंगलं आणि माळरानावर उमललेल्या पळसाच्या फुलांनी परिसराला आगळंवेगळं रूप प्राप्त झालं आहे. ही लालसर रंगछटा पाहताना डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडत असून निसर्गप्रेमींना अविस्मरणीय अनुभव देत आहे.

शहापूर तालुका परिसरातील तानसा अभयारण्य तसेच सह्याद्रीच्या वनराईत पळस वृक्षांची बहरलेली लाल फुलं म्हणजे निसर्गाची अद्भुत देणगीच म्हणावी लागेल. शहापूर, आटगावकडून तानसा अभयारण्याकडे जाताना, तसेच वासिंद, दहागाव, नेवाडे, पिवळी, शेई, शेरा, आंबर्जे, मासवणे, बावघर आणि किन्हवलीकडून टाकीपठारकडे जाताना या लाल फुलांची रांग जणू काही पर्यटकांच्या स्वागतासाठी उभी आहे, असा भास होतो.

भरगच्च हिरवीगार पानांच्या सान्निध्यात फांद्यांवर उमललेली गडद लाल फुलं नजरेत भरतात आणि क्षणभरासाठी पावलं थांबवतात. या फुलांच्या सौंदर्यात अशी काही विलक्षण ताकद आहे की नजर हटतच नाही. हे निसर्गवैभव अनुभवण्यासाठी तुम्हाला महाबळेश्वर, ऊटी, शिमला, बंगळुरू किंवा काश्मीर येथे जाण्याची गरज नाही. शहापूरच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्येच पळस फुलांचं हे मनमोहक विश्व अनुभवता येत आहे. आणखी महिनाभर ही लालसर फुलं आपल्या सौंदर्याची उधळण करत राहणार असून निसर्गप्रेमींसाठी हा सुवर्णकाळ ठरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *