हिंद की चादरला मानवंदना

 रत्नागिरी जिल्ह्यात सामूहिक गीतगायन

नाचणे येथे जिल्हाधिकाऱ्यांची, तर दामले विद्यालयात अपर जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

अशोक गायकवाड

रत्नागिरी : शिखांचे नववे गुरु हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्ष निमित्ताने आज सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामुहिक गायन झाले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र.१ येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत हे गायन झाले. हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र. १, दामले हायस्कूल येथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनकाळावर आधारित सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गायलेले गीत समूह गीत म्हणून गाण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र.१ येथील कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षक दीपक नागवेकर, सौरभी पवार, विनोदिनी कडवईकर, विद्या कोकजे उपस्थित होते. ग्रंथभेट देऊन जिल्हाधिकारी जिंदल यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सर्व उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुशा आदी स्पर्धा राबवाव्यात. विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनात राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, अशा स्पर्धांमध्ये स्वत:च्या शाळेचे, आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दामले हायस्कूल येथील कार्यक्रमात मुख्याध्यापक भगवान मोटे, उपमुख्याध्यापक जुलेखा काझी, मंडळ अधिकारी प्रताप कोल्हे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गलांडे म्हणाले, श्री गुरु तेग बहादूर यांचे बलिदान, त्यांचे कार्य आताच्या पिढीला माहित व्हावे, यासाठी हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे पंतप्रधान यांच्या उपस्थित मोठा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमात दामले शाळेतील मुलांनी घेतलेला भाग आणि त्यामध्ये मिळविलेले यश हे खूप कौतुकास्पद आहे. यापुढेही १ मार्चपर्यंत शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सहभाग घ्यावा, आपल्या शाळेचे नाव उंचावर न्यावे, अशा शुभेच्छा यावेळी गलांडे यांनी दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त यांनी हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने दिलेला संदेश सर्वांना ऐकविण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *