हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम

अनिल ठाणेकर

ठाणे,– “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी, ठाणे येथे  २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता विशेष समूहगान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले प्रेरणादायी गीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागातून सामूहिकरित्या गायन करण्यात आले. समूहगानातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, प्रकल्प संचालक (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, उपशिक्षणाधिकारी (योजना) शुभांगी बढे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंझारराव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच मुख्याध्यापिका मानसी मिलिंद ढवळीकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त समूहगान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी वर्गाने विविध शाळांना भेट देऊन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्ती, त्याग व मानवतेचा संदेश देणाऱ्या या समूहगान उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आगामी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्याषका मुख्य शहीदी समागम कार्यक्रमासाठी या उपक्रमातून सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *