कोकण विभागात ५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमला ‘हिंद-दी-चादर’

 बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये विश्वविक्रम नोंद

नवी मुंबई : (अशोक गायकवाड) – हिंदुस्थानी संस्कृती व मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कोकण विभागात अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील तब्बल २० हजार शाळांमधील सुमारे ५१ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी सादर केलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सामूहिकरीत्या गायले. या विक्रमी उपक्रमाची नोंद बेस्ट ऑफ इंडियामध्ये करण्यात आली असून, कोकण विभागाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा क्षण ठरला.

नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमी येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ, माहिती उपसंचालक मनोज सानप, सहायक आयुक्त डॉ. सागर घोलप, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त दिपाली दिवेकर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोडे, गुरुबचन सिंग सिंघल, जसपाल सिंग नागरा, नगरसेवक कुलदीप सिंग सुरी, जसविंदर सिंग, मुख्याध्यापिका अमरजित कौर सेनी आणि ज्येष्ठ पत्रकार बी. पी. नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी गुरु तेग बहादूर यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खारघर सेक्टर २९ येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या भव्य समागमाला जगभरातून १५ ते २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या विक्रमी सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, हे सामूहिक गायन सामाजिक ऐक्य अधिक दृढ करणारे आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी खारघर येथील सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

सकाळी ठिक ९ वाजता शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक गायनाला सुरुवात झाली. प्रास्ताविकात मनोज सानप यांनी महाराष्ट्र शासनाच्या या मोहिमेचे स्वरूप केवळ व्हिडिओ उपक्रमापुरते मर्यादित न राहता संस्कारांची डिजिटल चळवळ बनल्याचे सांगितले. गुरुबचन सिंग यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक संचालक संजीवनी जाधव-पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *