१० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित
राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार
कल्याण : इयत्ता १० वीच्या पहिल्या लेखी परीक्षेदरम्यान शाळेत वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना कल्याणमधील अनेक शाळांमध्ये घडली होती. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांची भेट घेत निवेदन देत वीजपुरवठा खंडित झाल्यास शाळांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याची मागणी केली. यावेळी भानुदास घुगे, दिनेश मढवी, प्रेमनाथ मढवी, मजरखान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
२० फेब्रुवारीला इयत्ता १० वीचा पहिला लेखी पेपर सुरू असताना कल्याण डोंबिवली महानगर पालिका शेत्रातील शाळांमध्ये सकाळी ११:३० वाजे पासून वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत उकाडा व अस्वस्थतेमध्ये परीक्षा द्यावी लागली.
इयत्ता १० वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. वर्षभर कष्ट करून तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र वीज नसल्यामुळे पंखे, लाईट तसेच इतर आवश्यक सुविधा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता बाधित झाली व त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित शाळांना वीजपुरवठा नियमित व अखंडित ठेवण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, तसेच या घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रुपेश थळे यांनी केली आहे.
